रायपूरच्या शेतकऱ्यांची व्यथा : विहिरीसह शेतआखाडा उद्ध्वस्त, गाडेकर कुटुंबासह १२ शेतकरी हवालदिल
सेलू : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या जालना- परभणी – नांदेड द्रुतगती महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीमुळे अनेक शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. तालुक्यातील रायपूर येथील शेतकरी रामेश्वर गाडेकर यांच्या वडिलापार्जित २४ एकर शेतीमधील ४ एकर जमीन या महामार्गासाठी संपादित करण्यात आली आहे. यामुळे शेती दोन तुकड्यात विभागली गेली आहे.
मात्र, या संपादनामुळे संपूर्ण गाडेकर कुटुंब व ११ शेतकरी रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. बागायती जमीन असतानाही केवळ नाममात्र भरपाई आणि प्रशासकीय त्रुटींमुळे शेतकऱ्यावर मोठा अन्याय झाल्याची भावना परिसरातून व्यक्त होत आहे.शेतकरी रामेश्वर गाडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, संपादित केलेली जमीन पूर्णपणे बागायती असून, जमिनीवर विहीर व इतर पाण्याचे स्त्रोत होते. शासनाचा नियमानुसार सर्व वायदा देखील वेळोवेळी भरलेला आहे. असे असतानाही महसूल नोंदींमधील त्रुटींमुळे किंवा नादुरुस्तीमुळे या बागायती जमिनीचे मूल्यांकन ‘कोरडवाहू’ म्हणून करण्यात आले आहे. रेडीरेकनरच्या दराप्रमाणे १ लाख ७१ हजार रुपयांच्या ४ पट मोबदला मिळणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात केवळ ३७७ रुपये प्रति झाड या दराने अत्यंत तुटपुंजे मूल्यांकन लावून प्रशासनाने शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळले आहे. १०० आंबे आणि २०० इतर झाडांची कत्तल, शेत आखाडा उद्ध्वस्त होणार आहेत. महामार्गाच्या कामात या जमिनीवरील तब्बल १०० आंब्याची आणि २०० इतर मौल्यवान झाडे बाधित झाली आहेत. या झाडांना केवळ ‘बिले’ मारून प्रशासनाने ती निष्कासित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. महामार्गाच्या रेषेत आल्यामुळे शेतकऱ्याचा पिढीजात शेत आखाडा आणि विहीर पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे. वर्षानुवर्षे कष्टाने उभे केलेले घर आणि शेतीचे अस्तित्व संपत आल्याने गाडेकर कुटुंब हवालदील झाले आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी, जमिनीचे पुनर्मूल्यांकन करून कोरडवाहू ऐवजी ‘बागायती’ दराने आणि योग्य रेडीरेकनरनुसार ४ पट मोबदला मिळावा, उद्ध्वस्त होणाऱ्या शेत आखाड्याचे व विहिरीचे योग्य मूल्यांकन करून भरपाई द्यावी, शेतीचे दोन भाग झाल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी तात्काळ पर्यायी रस्ता मंजूर करावा, अशा मागण्या केल्या आहेत.
शेतीचे तुकडे; रस्त्याचा प्रश्न गंभीर
४ एकर जमीन नेमकी शेताच्या मधोमध संपादित झाल्यामुळे उर्वरित २० एकर शेतीचे आता दोन वेगवेगळे भाग पडले आहेत. महामार्गाच्या संरक्षण भिंतींमुळे एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी किंवा शेतमाल आणण्यासाठी कोणताही रस्ता राहिलेला नाही. शेतजमीन असूनही तिथपर्यंत पोहोचता येत नसल्याने उर्वरित शेती कशी करायची ? असा गंभीर प्रश्न आता या १२ शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
“वडिलाोपार्जित बागायती शेती समृद्धी महामार्गात गेली. प्रशासनाने बागायती जमिनीला कोरडवाहू दाखवून केवळ ३७७ रुपये झाडाचे मूल्यांकन केले आहे. घर, विहीर, आखाडा सगळंच उद्ध्वस्त होत आहे आणि शेताचे दोन तुकडे झाल्याने उर्वरित शेतात जायला रस्ताही उरलेला नाही. हा आमच्यावर थेट अन्याय आहे. सरकारने आमची पुन्हा चौकशी करून योग्य न्याय द्यावा.” – रामेश्वर गाडेकर, बाधित शेतकरी, रायपूर ता. सेलू





