ध्रुव साकोरे यांचे प्रतिपादन, सेलू पंचायत समितीत अत्याधुनिक दिव्यांग संसाधन कक्षाचे उद्घाटन
सेलू : पंचायत समिती, सेलू येथील गट संसाधन केंद्र (बीआरसी) येथे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक दिव्यांग संसाधन कक्षाचे उद्घाटन शुक्रवारी, १७ जुलै २०२६ रोजी करण्यात आले. दीपस्तंभ प्रतिष्ठान, परभणी, सतीश वाघ फाउंडेशन, मुंबई यांच्या सामाजिक दायित्व निधी (सीएसआर) तसेच पंचायत समिती, सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम साकारण्यात आला.
उद्घाटनप्रसंगी दीपस्तंभ प्रतिष्ठानचे संचालक ध्रुव मेघना दीपक साकोरे म्हणाले, “दीपस्तंभ प्रतिष्ठान प्रत्येक गरजूंमागे सक्षमपणे उभे होते, आहे आणि भविष्यातही राहील. दिव्यांग विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा, आवश्यक साधने आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे ही आमची सामाजिक बांधिलकी आहे.”
दिव्यांग संसाधन कक्षात आधुनिक शैक्षणिक साहित्य, सहाय्यक उपकरणे, समुपदेशन, कौशल्य विकासासाठी आवश्यक साधने, पालक मार्गदर्शन तसेच शिक्षक प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना मिळून त्यांचा आत्मविश्वास, स्वावलंबन आणि सर्वांगीण विकासाला बळ मिळणार आहे. महाराष्ट्राच्या राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या पुढाकारातून साकारलेला हा उपक्रम समावेशक शिक्षणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानला जात आहे.
गटवविकास अधिकारी उदय जाधव यांनी दिव्यांग संसाधन कक्षासाठी सामाजिक दायित्व निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल दीपस्तंभ प्रतिष्ठान, परभणी यांचे विशेष आभार मानले. तसेच दिव्यांग कल्याण विभागामार्फत दिव्यांग अनुकूल स्वच्छतागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नतीशा माथुर यांचेही त्यांनी आभार व्यक्त केले. यावेळी दिव्यांग संसाधन कक्षाच्या उभारणीत मोलाची भूमिका बजावणारे श्री. भुजंग थोरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.कार्यक्रमास अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती श्रीमती विजयमाला डोंबे, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, शिक्षण विभागासह विविध विभागांचे अधिकारी, शिक्षक, पालक, दिव्यांग विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





