‘एक दिवस एक पुस्तक’ उपक्रम : ‘ऊन सावलीच्या शोधात’ कादंबरीवर प्रा. डॉ. सखाराम कदम यांचे प्रतिपादन
सेलू : संकटांवर मात करून आनंदाने जगण्याची उभारी आणि कुटुंबाला आधार देण्याची विलक्षण क्षमता स्त्रियांमध्ये असल्याचे प्रतिपादन प्रा. डॉ. सखाराम कदम यांनी केले. स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालय, सेलूच्या वतीने आयोजित ‘एक दिवस एक पुस्तक’ उपक्रमातील ४२व्या पुष्पात ‘ऊन सावलीच्या शोधात’ या कादंबरीवरील समीक्षात्मक व्याख्यानात ते बोलत होते.
त्यांनी सांगितले की, कादंबरीकार बा. बा. कोटंबे यांनी १९७२ च्या भीषण दुष्काळाचे हृदयस्पर्शी चित्रण करत स्त्रियांच्या संघर्षमय जीवनजाणीवा प्रभावीपणे मांडल्या आहेत. कितीही मोठे संकट आले तरी न डगमगता धैर्याने संसार उभा करण्याचे सामर्थ्य स्त्रियांमध्ये असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्तात्रय माकोडे होते, तर कादंबरीकार बा. बा. कोटंबे प्रमुख उपस्थित होते. त्यांनी कादंबरीच्या निर्मिती प्रक्रियेविषयी मनोगत व्यक्त केले. यावेळी ग्रंथालयाचे नियमित वाचक असलेल्या आणि नुकतीच केंद्रप्रमुखपदी नियुक्ती झालेल्या दत्तात्रय यादव, कृष्णा शिंदे, विजय तुरकर व धनंजय ठोंबरे यांचा ग्रंथालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप डासाळकर यांनी केले. सूत्रसंचालन विजय आवटे यांनी केले, तर आभार अमोल बिडवे यांनी मानले. कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, ग्रंथप्रेमी आणि श्रोत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.ग्रंथ भेटीतून वाचन संस्कृतीला चालना : वाचन-लेखन चळवळ अधिक व्यापक व्हावी आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाच्या वतीने शहरातील शारदा विद्यालय व के. बा. विद्यालय यांना ग्रंथ भेट देण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा वाचनालयाकडे ओढा वाढून वाचन संस्कृती अधिक बळकट होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.





