परभणीत कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत
परभणी : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद वामनराव कदम बोर्डीकर यांची आणि उपाध्यक्षपदी राजेश साहेबराव पाटील गोरेगावकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या निवडीकरीता शेतकरी भवन सभागृहामध्ये सोमवारी, ३ ऑगस्ट २०२६ रोजी बँकेच्या नवनिर्वाचित संचालकांची विशेष सभा आयोजित करण्यात आली. निवड प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा अध्यासी अधिकारी एस.पी.काकडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.सकाळी अकरा ते साडे अकरा या वेळेत ही दोन्ही पदाकरीता उमेदवारी अर्ज मागविण्यात आले. छाननी प्रक्रिया पाठोपाठ पार पडली. अध्यक्षपदासाठी जेष्ठ नेते बोर्डीकर आणि भावना सचिन मुंगसे बोर्डीकर असे दोन उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी भावना बोर्डीकर यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. केवळ एकच उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने श्री.बोर्डीकर यांची बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे अध्यासी अधिकारी यांनी घोषित केले. उपाध्यक्षपदाकरिताही आमदार सईद खान शेरगुल खान आणि राजेश साहेबराव पाटील गोरेगावकर असे दोन उमेदवारी अर्ज प्राप्त झाले. मात्र, आमदार सईद खान यांनी अर्ज मागे घेतल्याने राजेश पाटील यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आलेही प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी एस.पी.काकडे यांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी एम. यु. यादव आणि बी.एस.नांदापूरकर तसेच सचिन लोणीकर, डी.जी.पठाण आणि गोविंद कदम यांनी सहकार्य केले. निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचा श्री.काकडे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकटेश कुरुंदकर, सचिन माळवटकर आदींनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. दरम्यान, या निवडीचे सहकार भवन परिसरात कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, आमदार राजेश विटेकर, आमदार रत्नाकर गुट्टे आदींसह संचालक व मान्यवर उपस्थित होते.





