साकार ग्रुपच्या महिला कलाकारांचे आवाहन, नूतन विद्यालय शिक्षण संस्था आणि सेलू महिला मंडळाचा संयुक्त उपक्रम
सेलू : घरातील मुले आई-वडिलांचा आरसा असतात. त्यामुळे आनंददायी पालकत्वासाठी जबाबदारीने वागावे. कुटुंबात एकवाक्यता असावी आणि कुटुंबातील सकारात्मक संवादातून नात्यांची वीण घट्ट करायला हवी. आपण मुलांचे पालक आहोत, मालक नाही ही जाणीव प्रत्येक पालकांना असावी, असा संदेश ‘कुटुंबातील संवाद’ या मनोरंजनात्मक व्याख्यान नाट्याविष्कारातून साकार ग्रुपच्या सदस्यांनी दिला.
येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था आणि महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने कै. श्रीरामजी भांगडिया शतकोत्तर रजत जयंती निमित्त आयोजित साकार ग्रुप (छत्रपती संभाजी नगर) प्रस्तुत ‘कुटुंबातील संवाद’ हे मनोरंजनात्मक व्याख्यान नाट्याविष्कारासह बुधवार (दि. १९) रोजी नूतन कन्या प्रशालेच्या परिसरातील कै. कमलाबाई आसारामजी बाहेती सभागृहात ३ सत्रांत उत्साहात संपन्न झाले.साकार ग्रुपच्या वैशाली अवलगावकर, रूपाली अष्टपुत्रे, अर्चना ढोबे, लीना वैद्य, रागिणी कोठेकर आणि अनिता सपकाळ (छत्रपती संभाजी नगर) यांनी सकाळच्या सत्रात इयत्ता ५ वी ते ७ वीतील विद्यार्थिनींसाठी ‘आहार, व्यायाम आणि खेळ’ या विषयावर, इयत्ता ८ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींसाठी ‘मैत्री, प्रेम आणि आकर्षण’ या विषयावर, तर पालक व शिक्षकांसाठी दुपारच्या सत्रात ‘कुटुंबातील संवाद’ या विषयावर सादरीकरण केले. या मनोरंजनात्मक व्याख्यान व नाट्याविष्कारास विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एस. एम. लोया हे होते. तर व्यासपीठावर कार्यकारिणी सदस्य दत्तराव पावडे, राजेश गुप्ता, महिला मंडळाच्या सचिव ललिता गिल्डा, कार्यक्रमाच्या संयोजक निशा पाटील, किरण देशपांडे, सुभाष बिरादार, एकनाथ जाधव, कांचन बाहेती, केशव खरात, वसुधा खारकर, रेणुका महाजन, प्रकाश शेरे, अश्विनी ढाकणे, सुनील घोडके आणि पल्लवी मुंडे यांची उपस्थिती होती.प्रास्ताविक नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी शरद कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन कीर्ती राऊत यांनी केले, तर आभार प्रदर्शन माजी मुख्याध्यापक उज्ज्वला लड्डा यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शशिकांत देशपांडे, भालचंद्र गांजापूरकर, अतुल पाटील, एस. आर. सुरवसे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि महिला मंडळाच्या सदस्यांनी पुढाकार घेतला.
मुलांचे डिजिटल लाईफ नियंत्रित करा जगाचा वेग वाढला आहे आणि या धावण्याच्या शर्यतीत संवाद हरवला आहे. आजच्या काळात डिजिटल लाईफ अनियंत्रित झाले आहे. त्यामुळे वास्तविक जीवनापेक्षा मुलांचे आभासी जग आणि डिजिटल लाईफ नियंत्रित करणे अत्यंत गरजेचे आहे. मुले वाढविण्याची जबाबदारी केवळ आई-वडिलांची नसून कुटुंब, शिक्षक आणि समाजाचीही आहे. मुलांची कुणाशीही तुलना करू नये आणि मुलांना आपला वेळ द्यावा. मुलांशी परिपूर्ण व सकारात्मक संवाद साधल्यास मुले आत्मविश्वासाने वावरतात. मुलांना समजून घ्यायला हवे; मुलांनी हट्ट धरलेल्या एखाद्या गोष्टीला आपण ‘का नाही म्हणत आहोत’ याचे स्पष्ट कारण मुलांना सांगायला हवे. पालकांनी स्वतः मोबाईल आवश्यकतेनुसार वापरला तर मुलेही जास्त मोबाईल वापरणार नाहीत. पालकांनी स्वतःचे वाचन वाढविले तर मुलेही पुस्तके वाचतील, हा मोलाचा संदेश या नाट्याविष्कारातून साकार ग्रुपच्या कलाकारांनी दिला.





