पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिल्या शुभेच्छा; सेलू पंचायत समितीचा पुढाकार
सेलू : ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना देशातील नामांकित वैज्ञानिक, शैक्षणिक, औद्योगिक व ऐतिहासिक स्थळांचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा आणि त्यांच्या ज्ञानाला व्यापक दिशा मिळावी, या उद्देशाने आयोजित इस्रो आंतरराज्य अभ्यास दौऱ्यासाठी सेलू ( जि.परभणी) तालुक्यातील ४५ विद्यार्थ्यांची निवड झाली असून पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी यासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून शनिवारी, पाच सप्टेंबर २०२६ रोजी सेलू पंचायत समितीच्या वतीने पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी छोटेखानी शुभेच्छा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्ष मिलिंद सावंत, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती, नगरपरिषद पदाधिकारी व सदस्य आदींसह शिक्षक उपस्थित होते. यावेळी तालुक्यातून आदर्श शिक्षक म्हणून निवड झालेल्या वालूर येथील जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेचे मुख्याध्यापक षडानन देशमाने यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या अभ्यास दौऱ्याच्या निवडीसाठी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता सातवी व आठवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेतून गुणवंत ४५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून, हे विद्यार्थी येत्या सोमवारपासून (७ सप्टेंबर ) पाच दिवसीय आंतरराज्यीय अभ्यास दौऱ्यावर जाणार आहेत, अशी माहिती गटविकास अधिकारी उदय जाधव यांनी दिली. या अभ्यास दौऱ्यात विद्यार्थ्यांना पैठणी क्लस्टर पार्क, येवला; सापुतारा; विक्रम साराभाई स्पेस एक्झिबिशन सेंटर, अहमदाबाद; साबरमती आश्रम व साबरमती नदी; सिंधू संस्कृतीतील नगररचनेचे महत्त्वपूर्ण उदाहरण असलेले लोथल; अमूल डेअरी, आनंद; अडालजची ऐतिहासिक वाव तसेच स्टॅच्यू ऑफ युनिटी, एकता नगर अशा विविध महत्त्वपूर्ण स्थळांना भेट देण्याची संधी मिळणार आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या गुणवत्तेला योग्य संधी आणि व्यापक अनुभवाची जोड मिळावी, या उद्देशाने पंचायत समिती, सेलू यांच्या वतीने हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमासाठी पालकमंत्री बोर्डीकर यांनी आग्रही भूमिका घेतली, असे श्री.जाधव यांनी सांगितले. अभ्यास दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासोबतच देशाचा ऐतिहासिक, सांस्कृतिक व औद्योगिक वारसा प्रत्यक्ष अनुभवता येणार असून, त्यांच्या भविष्यातील शैक्षणिक वाटचालीस नवी दिशा मिळणार आहे.





