५५ कोटींचा खर्च, चार पदरी मार्ग, दोन सर्विस रोड, वाहतूक कोंडीतून वाहनधारकांची होणार मुक्तता
सेलू : सेलूमधील देवगाव फाटा ते परळी इंजेगाव ५४८ (ब) या राष्ट्रीय महामार्गावरील पाथरी रेल्वे गेटवर चार पदरी उड्डाणपूल उभारण्यासाठी संपादित करावयाच्या जमीन मोजणीस गुरुवारी सुरूवात झाली. या कामासाठी राष्ट्रीय महामार्ग जालना विभागाचे अभियंता धीरज भिसे, नितीन यादव तसेच तालुका भूमी अभिलेख कार्यालयाचे भूमापक कान्होजी रणबावळे यांनी प्रत्यक्ष मोजणीला सुरुवात केली. निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून संबंधित कंत्राटदारास कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. आगामी दीड वर्षात उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्याचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
ऑक्टोबर महिन्यात कामाला सुरुवात
मोजणीच्या अनुषंगाने रस्त्यालगतच्या सर्वे नंबर १९९, २००, २०५, २०८, २०९ आणि २१२ या गटातील सर्वच भूधारकांना १२ ऑगस्ट २०२६ रोजी सेलू येथील उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या वतीने भूसंपादन नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. आणि मोजणीच्या दिवशी उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले होते. गुरूवारी, १० सप्टेंबररोजी मोजणीस सुरूवात झाली. उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून भूसंपादनाची प्रक्रिया केली जाणार आहे. उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी मध्ये येणारी एक इमारत, दोन पत्र्याचे घरे आणि उर्वरित शेतजमीन संपादित केली जाणार आहे. भूसंपादन, मावेजा ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात होणार आहे.
दोन सर्विस रोड आणि भूयारी पूल
रेल्वे ड्डाणपुलाची लांबी १.१७ किमी आहे. यासाठी ०.७८ जमीन संपादित केली जाणार आहे. हा उड्डाणपूल चार पदरी असून यात तीन मोठे स्पॅन बसविले जाणार आहेत. २ स्पॅन १५ मीटरचे असून एक स्पॅन ६२ मीटरचा आहे. रेल्वे उड्डाणपुलाचा झिरो सेलू शहरातील ५४८ मार्गावरील चिरायू हॉस्पीटलजवळ, तर पाथरीरोडला कृष्णनगरजवळ येणार आहे. दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड असणार आहेत. यात एक सर्विस रोड रवळगावकडे भुयारीपूलमार्गे जाणार असून एक तहसील कार्याकडे जाणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, श्रीराम प्रतिष्ठानच्या शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी व तसेच रवळगावमार्गे जाणाऱ्या विविध गावातील प्रवाशांच्या सोयीसाठी या उड्डाणपुलावरून रवळगावकडे रस्ता देण्याची मागणी बाजार समितीचे सभापती डॉ. संजय रोडगे व जिल्हा परिषद सदस्या डॉ. सविता रोडगे यांनी निवेदनाद्वारे केलेली आहे. मात्र हा प्रश्न भुयारी पूलाव्दारे सर्विस रोड करून सोडविण्यावर भर दिल्याचे दिसून येत आहे.





