नोटिसानंतर सेलूत १३० अतिक्रमणे हटली; जिंतूर, मानवतमध्येही कारवाई
परभणी : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. देवगाव फाटा–सेलू मार्गे पाथरी या राष्ट्रीय महामार्ग ५४८ बी वरील १५० अतिक्रमणधारकांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. रायगड कॉर्नर ते जिंतूर नाका परिसरात नाली व रस्त्यावरील दुकाने, हातगाड्या आणि पत्र्यांच्या शेडमुळे वाहतुकीला अडथळा होत होता. नोटिसांनंतर १३० जणांनी स्वतःहून अतिक्रमणे हटवल्याने मार्गाने मोकळा श्वास घेतला आहे.
उर्वरित अतिक्रमणांवर अधिकारी अभिजित घोडेकर, गजानन कामेकर, धीरज भिसे व नितीन यादव कारवाई करत आहेत.दुसरीकडे, जिंतूर शहरातील जालना रस्त्यावरील अण्णाभाऊ साठे चौकापासून पुढील एक ते दोन किलोमीटर अंतरावरील अतिक्रमणे सार्वजनिक बांधकाम विभागाने न्यायालयाच्या आदेशानुसार जेसीबीने हटवली. सहायक अभियंता शिंदे व पोलिस निरीक्षक नामदेव रेड्डी यांच्या उपस्थितीत हा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.तसेच, मानवत शहराच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग ६१ वर रस्त्याच्या मध्यभागापासून दुतर्फा १५ मीटर अंतरातील बांधकामे महसूल, पोलिस आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाने संयुक्तपणे हटवली. महाराणा प्रताप चौकात इमारतीच्या पायऱ्या पाडल्याने काही नागरिक वर अडकले होते, तर नोटीस न देता बोर्ड पाडल्याने १ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा एका हॉटेल चालकाने केला आहे.
जिल्हाधिकारी चव्हाण यांनी घेतला आढावा
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील अतिक्रमणे ३१ ऑगस्टपूर्वी काढण्याच्या कार्यवाहीचा आढावा जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी ऑनलाईन बैठकीत घेतला. कार्यवाहीचा वेग वाढवून रस्ते मोकळे करण्याचे निर्देश त्यांनी दिले. या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, मनपा आयुक्त नितीन नार्वेकर, राष्ट्रीय महामार्गाच्या अधीक्षक अभियंता तृप्ती नाग, उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण, जीवराज डापकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष पाराशर, तहसीलदार व मुख्याधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकाऱ्यांनी एनएच-७५२-आय, एनएच-७५२-के, एनएच-३६१-एफ आणि एनएच-६१ परभणी बायपाससह पाथरी, मानवत भागातील रस्त्यांचा आढावा घेतला. आवश्यकता भासल्यास पोलीस बंदोबस्त घेऊन नियमानुसार निष्कासन करावे, ब्लॅक व डार्क स्पॉटवर सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात आणि अतिक्रमण काढण्यापूर्वी व नंतरची छायाचित्रे घ्यावीत, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.





