विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांनी दिला कृतज्ञतेचा संदेश
सेलू : बोर्डीकर्स पोद्दार लर्न स्कूल, सेलू येथे राष्ट्रीय कृषी दिन आणि डॉक्टर डे मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये शेतकरी व वैद्यकीय क्षेत्राविषयी आदरभाव निर्माण व्हावा तसेच त्यांच्या कार्याचे महत्त्व समजावे, हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
या निमित्ताने विद्यार्थ्यांनी शेतकरी, डॉक्टर, परिचारिका तसेच कृषी क्षेत्राशी संबंधित विविध व्यक्तिमत्त्वांची आकर्षक वेशभूषा सादर केली. कृषी आणि आरोग्य या विषयांवर आधारित नृत्य, नाटिका आणि भाषणे यांचे प्रभावी सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांचे कष्ट, अन्नसुरक्षेतील त्यांचे योगदान तसेच डॉक्टरांचे समाजासाठीचे निःस्वार्थ कार्य यावर प्रकाश टाकला.कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या मुख्याध्यापिका ऋतू श्रीवास्तव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शेतकरी आणि डॉक्टर हे समाजाचे खरे आधारस्तंभ असल्याचे सांगितले. शेतकरी अन्नदाता असून डॉक्टर आरोग्याचे रक्षण करणारे जीवनदाते आहेत. या दोन्ही घटकांविषयी प्रत्येकाने कृतज्ञता, आदर आणि संवेदनशीलता बाळगावी, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण वातावरण आनंददायी, प्रेरणादायी आणि देशप्रेमाने भारावून गेले.





