दरवाजे तात्काळ बंद न केल्यास ७ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणाचा इशारा; जलसंपदा मंत्र्यांना निवेदन सादर
सेलू : परभणी जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी बांधव परेशान आहेत. त्यातच सेलू तालुक्यातील मोरेगाव येथील दुधना नदीवरील बंधाऱ्याचे दरवाजे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्याने उघडल्याने सदर ठिकाणचा पाणी साठा झपाट्याने कमी होत आहे.या बंधाऱ्यावर लगतच्या २० गावांची पाणी पुरवठा योजना अवलंबून आहे. असे असताना दरवाजे उघडण्याचा प्रताप या विभागातील अधिकाऱ्यांनी केला आहे.
त्यातच एका महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने लवकरच भीषण पाणीटंचाई तसेच जनावरांच्या चारा व पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली असून पाणी पातळी सातत्याने कमी होत आहे.त्यामुळे बंधाऱ्याचे दरवाजे तात्काळ बंद करण्यात यावेत, यासाठी यापूर्वीच निवेदन देण्यात आले होते. मात्र अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
सदर बंधाऱ्याचे दरवाजे तात्काळ बंद करण्यात यावेत, अन्यथा दिनांक ७/९/२०२६ रोजी या परिसरातील शेतकरी बांधवांतर्फे तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.या आशयाचे निवेदन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना तहसीलदार सेलू यांच्यामार्फत पाठवण्यात आले आहे.या समस्येवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली असून निवेदनावर श्रीकांत वाईकर, ओमप्रकाश चव्हाळ, इसाक पटेल, रामेश्वर शेवाळे, देवराव दळवे, लक्ष्मण प्रधान, मुकुंद टेकाळे, भारत झाल्टे, राजेंद्र केवारे, अजित मंडलिक, योगेश काकडे, सतिश काकडे, आबासाहेब भुजबळ, योगेश सुर्यवंशी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.





