पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर विविध विकासकामांची पाहणी करणार
सेलू : सेलू नगरपरिषदेच्या वतीने समता नगर येथे साकारण्यात आलेल्या नमो उद्यानाचा लोकार्पण सोहळा उद्या शनिवार, दि. ०५ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते या उद्यानाचे उद्घाटन होणार आहे.
या उद्घाटन सोहळ्यासह पालकमंत्री शहरात राबविण्यात येत असलेल्या विविध पर्यावरणपूरक व लोकोपयोगी प्रकल्पांची पाहणी करणार आहेत. यामध्ये सरस्वती शिक्षक कॉलनी येथील देववन मियावाकी घनवन प्रकल्पास त्या दुपारी १२.०० वाजता सदिच्छा भेट देतील. त्यानंतर दुपारी १२.३० वाजता वालूर नाका परिसरातील जुन्या डंपिंग ग्राउंड येथे सुरू असलेल्या मोकाट श्वान निर्बीजीकरण व निवारा केंद्राच्या कामाची त्या पाहणी करतील.
या कार्यक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नगराध्यक्ष मिलिंद सावंत, उपनगराध्यक्ष साईराज बोराडे, मुख्याधिकारी महेश गायकवाड, बांधकाम सभापती मनीष कदम, नगरसेवक दीपक कोल्हाळ, शांताबाई रघुवंशी, अन्वर खान पठाण, शेख रहिमा बेगम यांच्यासह सेलू नगर परिषदेचे सर्व सभापती, नगरसेवक व कर्मचारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.





