शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी
फुलचंद भगत/वाशिम :- मंगरूळपीर तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीची तातडीने दखल घेऊन तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी,वाशिम यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
मंगरूळपीर तालुक्यात पावसाअभावी शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, शेतीपिकांवरही विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील दुष्काळजन्य परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने तातडीने पंचनामे करून परिस्थितीचा आढावा घ्यावा व मंगरूळपीर तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असून, शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत व आवश्यक दिलासा द्यावा, अशीही मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली.निवेदन देतेवेळी शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी वानखेडे,उपजिल्हाप्रमुख सचिन परळीकर,शिवसेनेचे मंगरूळपीर तालुकाप्रमुख अर्जुन सुर्वे,निखिल इंगोले,भागवत शिंदे,शिवा सावके,धीरज राऊत,राम सावके,ओमप्रकाश इंगळे,राहुल माळी, आनंदा काळे आणि शंकर सावके उपस्थित होते.मंगरूळपीर तालुक्यातील गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन शासनाने कोरडा दुष्काळ जाहीर करावा व शेतकरी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.





