सेलू | प्रतिनिधी : भारतीय चित्रपटसृष्टीतील महान गायक, अभिनेता आणि संगीतप्रेमींच्या हृदयावर अधिराज्य गाजविणारे किशोर कुमार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सेलू येथील ‘स्वरयात्री कलाकार ग्रुप’च्या वतीने मंगळवारी (दि. ४ ऑगस्ट) साळवे हॉल येथे भावपूर्ण ‘स्वरसुमनांजली’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमात किशोर कुमार यांच्या विविधांगी गायकीचा सुरेल आविष्कार सादर करण्यात आला. प्रेमगीते, रोमँटिक गीते, विनोदी गीते तसेच त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण यॉडलिंग शैलीतील लोकप्रिय गीतांनी उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. ‘भोले हो भोले’, ‘एक लडकी भीगी भागी सी’, ‘अपनी तो’, ‘एक अजनबी’, ‘रोते हुए’, ‘ओ दिल के चैन’, ‘मंजिलें अपनी जगह’, ‘सारा जमाना’, ‘जिंदगी का सफर’, ‘अगर तुम ना होते’, ‘ओ माझी रे’ आणि ‘नीले नीले अंबर’ यांसह अनेक लोकप्रिय गीतांचे सादरीकरण करण्यात आले.या वेळी सचिदानंद डाखोरे, गंगाधर कान्हेकर, शिरीष संघई, डॉ. आशिष मेहता, डॉ. राजेंद्र मुळावेकर, दीपक देवा, आत्माराम साळवे, संजय मंडलिक, शाम मालाणी, सतीश ताठे, दिशागत सर, डॉ. संजय हरबडे, डॉ. विलास मोरे आदी कलाकारांनी आपल्या सुरेल गायकीने किशोर कुमार यांच्या अजरामर गीतांना उजाळा दिला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माधवराव काकडे, नगरसेवक मिलिंद पवार, बालाजी साळवे व सुमित सोमाणी उपस्थित होते. किशोर कुमार यांच्या आवाजातील भाव, सूर आणि त्यांच्या गीतांमधील संवेदनशीलता यांचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले. अशा संगीत कार्यक्रमांमुळे नव्या पिढीला किशोर कुमार यांच्या समृद्ध संगीत वारशाची ओळख होण्यास मदत होते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दत्तूसिंग ठाकूर, जाकेर लाला, रवी मुळावेकर, पूनमचंद खोना, संदेश खरात, प्रविण मोटे व डॉ. सौ. प्रिती मेहता यांच्यासह ‘स्वरयात्री कलाकार ग्रुप’च्या सदस्यांनी परिश्रम घेतले.





