लिखित पिंपरी गावात देशभक्तीचे वातावरण; गुणवंतांचा सत्कार
परतूर : येथील संत तुकाराम विद्यालयात १५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने प्रभात फेरी आणि विविध गुणदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
शाळेच्या प्रांगणात सुंदर रांगोळी काढलेली होती. सकाळी ०७ वाजता लिखित पिंपरी गावातून विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम् या घोषणांनी संपूर्ण परिसर देशभक्तीमय झाला होता. विद्यार्थ्यांनी पथसंचालन करून अतिथींना कार्यक्रम स्थळी आणले.त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व संस्था सचिव परमेश्वर राजबिंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था कोषाध्यक्ष नंदकिशोर परताणी होते. तर प्रमुख अतिथी शेषनारायण गोसावी, संस्थाध्यक्ष रामकिसन सोळंके (आबा), आबासाहेब तौर, शोभाताई परताणी, विजयाताई सोळंके (आत्या), गौतम सिंगी, पालक प्रतिनिधी गजानन भाले आणि मुख्याध्यापक बी. आर. काटे यांची प्रमुख उपस्थिती होती.ईश्वरी सोळंके व अनुजा निचळ या विद्यार्थिनींनी स्वागतगीत गाऊन उपस्थितांचे स्वागत केले. सुरासे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी शाळेतील ५ विद्यार्थ्यांचा एकाच वेळी वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर वर्गनिहाय विद्यार्थ्यांनी भाषणे आणि गीते सादर केली, त्यांना मान्यवरांच्या हस्ते पुस्तके भेट देण्यात आली.याप्रसंगी परमेश्वर राजबिंडे, शेषनारायण गोसावी, रामकिसन सोळंके, शोभाताई परताणी, नंदकिशोर परताणी आणि आबासाहेब तौर यांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थी, शिक्षक आणि सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले व सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.वर्ग १० वीतील विद्यार्थिनी पृथ्वी बर्वे हिने भारतमातेची सुंदर वेशभूषा साकारली होती. श्रावणी राऊत हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर दराडे यांनी आभार मानले. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी सहमुख्याध्यापक एस. डी. गिरी, सहमुख्याध्यापक वर्षा कांडुरे, सर्व शिक्षकवृंद, गटशिक्षक, कार्यकर्ते, पालक मंडळी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





