‘महासागराचे पुनरुज्जीवन’ मधून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश
सेलू येथील नूतन इंग्लिश स्कूल द्वितीय, तर नूतन विद्यालय तृतीय क्रमांकावर
सेलू : अनेकविध उपक्रमांनी शैक्षणिक क्षेत्रात आगळीवेगळी ओळख निर्माण केलेल्या सेलू (जि.परभणी) तालुक्यातील पारडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने सेलू् तालुकास्तरीय विज्ञान नाट्य उत्सव स्पर्धेत सलग चौथ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली आहे.
पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने सेलू येथील नूतन विद्यालयात बुधवारी, २ सप्टेंबर २०२६ रोजी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत दुर्गम तांड्यावरच्या पारडी येथील शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘महासागराचे पुनरुज्जीवन’ या नाटकातून महासागराचे वाढते प्रदूषण, मानवी हस्तक्षेपामुळे समुद्रावर होणारे परिणाम आणि महासागर संवर्धनाची गरज या विषयाची प्रभावी मांडणी केली.
आरती राठोड, यश राठोड, जयश्री जाधव, गणेश राठोड, कार्तिक राठोड, पायल आढे, पुनम आढे आणि ऋतुजा लंघे या विद्यार्थी कलावंतांचा सहजसुंदर अभिनय, प्रभावी संवादफेक आणि विचार करायला लावणार्या नाट्य आशयाने उपस्थितांची मने जिंकली. या विद्यार्थ्यांना शिक्षक डी.के.कुलकर्णी, गणेश आकलोड, युवराज माने, बालासाहेब पंडित, योगेश काळे, करीम सय्यद व कैलास खजिने यांचे मार्गदर्शन लाभले.
या स्पर्धेत सेलू येथील नूतन इंग्लिश स्कूलने द्वितीय, तर नूतन विद्यालयाने तृतीय क्रमांक मिळविला. ज्येष्ठ नाट्यकर्मी रवी कुलकर्णी, उपेंद्र बेलूरकर व रामेश्वर चोथे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. डाएटचे ज्येष्ठ अधिव्याख्याता गणेश शिंदे, गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे, नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक के. के. देशपांडे, प्रसन्न भावसार, एस.जी.बोधनापोड, केंद्रप्रमुख दत्तात्रय यादव, साधनव्यक्ती सुनीता काळे आणि अंजली पद्माकर यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. सूत्रसंचालन शरयू चौधरी यांनी केले.
तेरा शाळांचा उत्स्फूर्त सहभाग
स्पर्धेत सेलू तालुक्यातील एकूण तेरा शाळांनी सहभाग नोंदविला. यामध्ये उत्कर्ष विद्यालय सेलू, यासेर उर्दू हायस्कूल सेलू, शांताबाई नखाते प्राथमिक आश्रम शाळा वालूर, पीएमश्री जिपकेंप्राशा डासाळा, जिप कन्या शाळा वालूर, प्रॉस्परस पब्लिक स्कूल सेलू, एलकेआर प्रिन्स सीबीएसई इंग्लिश स्कूल सेलू, ज्ञानतीर्थ विद्यालय सेलू, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हाळसापूर आणि कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय सेलू या शाळांचा समावेश आहे.





