शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची तहसीलदारांकडे मागणी; प्रतिहेक्टरी साठ हजार रुपयांच्या मदतीचे निवेदन
सेलू : सेलू तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ पीकविमा द्यावा तसेच प्रतिहेक्टरी रुपये ६० हजार रुपये भरपाई मदत करावी अशी मागणी सेलू-जिंतूर विधानसभा प्रमुख तथा माजी जि. प. गटनेते रामनाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंगळवारी, ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसीलदारामार्फत निवेदन सादर करण्यात आले आहे. सेलू तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून एकदाही पाऊस पडलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची सोयाबीन, कापूस, तूर, मूग इत्यादी सर्व पिके पाण्याअभावी करपून गेली आहेत, त्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यामुळे आर्थिक नुकसान झाले आहे, तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे, तसेच पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होणार आहे. वरील सर्व प्रकारामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ प्रतिहेक्टरी रुपये ६० हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, तसेच पीकविमा तात्काळ मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात यावा. गुरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यात याव्यात, पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येक गावात पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, मजुरांना रोजगार हमी योजने अंतर्गत गाव तिथे कामे उपलब्ध करून द्यावेत अशा विविध मागण्यांचे निवेदन आज तहसीलदार डॉ.शिवाजी मगर यांना देण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख अरुण ताठे, गुलाबराव खेडेकर, उपतालुकाप्रमुख अनिल रोडगे, उपशहरप्रमुख विष्णू नाईकनवरे, सर्कलप्रमुख अनिल पवार, उद्धवराव काष्टे, दीपक मगर, बाळासाहेब गाडेकर, अन्वर शेख, सर्जेराव गाडेकर, भागवत गाडेकर, आदित्य मस्के, शक्ती बोराडे, राहुल ताठे, दीपक ताठे, परमेश्वर सोळंके, दीपक रामपुरकर, भारत शिंदे, विनोद शिंदे, शंकर गाडेकर, सिद्ध ताठे आदी शिवसेनेचे पदाधिकारी व शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.





