अक्षदा मंगल कार्यालयात २७ ते २९ ऑगस्टदरम्यान आयोजन
परभणी : श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट अयोध्याचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरि यांच्या ‘शांती पर्व संदेश’ या विषयावरील विशेष व्याख्यानमालेचे आयोजन परभणीत करण्यात आले आहे. ही व्याख्यानमाला २७, २८ व २९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ७.३० या वेळेत वसमत रस्त्यावरील अक्षदा मंगल कार्यालय येथे होणार आहे.
स्वामी गोविंददेव गिरि हे अध्यात्म, भारतीय संस्कृती, राष्ट्रचिंतन आणि सामाजिक समरसता या विषयांवरील प्रभावी मार्गदर्शनासाठी परिचित आहेत. ३ दिवस चालणाऱ्या या विशेष व्याख्यानमालेत ‘शांती पर्व संदेश’ या विषयाच्या माध्यमातून जीवनातील शांतता, सद्भावना, संस्कार, भारतीय मूल्यव्यवस्था तसेच समाजातील परस्पर सौहार्द याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक शांतता, सकारात्मक विचार आणि सामाजिक सलोख्याचे महत्त्व वाढले आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेली ही व्याख्यानमाला नागरिकांसाठी आध्यात्मिक तसेच वैचारिकदृष्ट्या उपयुक्त ठरणार आहे. भारतीय संस्कृतीतील जीवनमूल्ये आणि समाजातील परस्पर स्नेह, बंधुभाव व समरसता याबाबतचे विचार ऐकण्याची संधी परभणीकरांना मिळणार आहे.व्याख्यानमालेनंतर उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या आध्यात्मिक व वैचारिक कार्यक्रमाचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन गोविंदप्रसाद श्रीनिवास अजमेरा व समस्त अजमेरा परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.





