माविमच्या राज्यस्तरीय बैठकीत वाशिम जिल्ह्याला तृतीय क्रमांकाचा मान
वाशिम : महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) आयोजित राज्यस्तरीय वार्षिक आढावा बैठकीत अमरावती विभागाने राज्यात प्रथम, तर वाशिम जिल्ह्याने तृतीय क्रमांक पटकावला आहे. ३० व ३१ जुलै २०२६ रोजी पार पडलेल्या या बैठकीत महिला बचत गटांचे सबलीकरण, आर्थिक समावेशन, रोजगारनिर्मिती आणि माविमच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीच्या निकषांवर ही निवड करण्यात आली.
माविमच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती राजलक्ष्मी शाह (भा.प्र.से.) यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी महाव्यवस्थापक महेंद्र गमरे, अशोक फाळणीकर, कार्यक्रम व्यवस्थापक श्रीमती रूपा मिस्त्री, व्यवस्थापक श्रीमती गौरी दोंदे, विभागीय सल्लागार केशव पवार आणि विभागीय व्यवसाय सल्लागार पवन देशमुख उपस्थित होते.जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी, लोकसंचालित साधन केंद्रांचे प्रतिनिधी आणि महिला बचत गटांच्या सदस्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हे यश मिळाले आहे. महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी राबविलेल्या उपक्रमांना मिळालेल्या या पावतीमुळे वाशिम जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, बचत गटांना स्वावलंबी बनविण्याच्या माविमच्या कार्याला यामुळे अधिक बळ मिळाले आहे.





