सोन्याच्या दागिन्यांच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या आरोपीस अटक; ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त
फुलचंद भगत/ वाशिम:-वाशिम शहरात सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक करून नागरिकांची आर्थिक लूट करणाऱ्या आरोपीचा वाशिम पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या ४८ तासांत शोध घेतला. पोलिसांनी आरोपीस अटक करून त्याच्याकडून सुमारे ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे फसवणुकीचे प्रकरण उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी वाशिम शहरातील सोनखास रोड परिसरात फिर्यादी जात असताना दोन अनोळखी इसमांनी त्यांना अडविले. त्यानंतर हातचलाखीने त्यांच्याकडील सोन्याच्या दागिन्यांशी संबंधित फसवणूक केल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली. या प्रकरणी वाशिम शहर पोलिस ठाण्यात संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांनी गुन्हा उघडकीस आणण्याबाबत निर्देश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला.तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले. ३ सप्टेंबर २०२६ रोजी परळी वैजनाथ येथे पथक पाठवून स्थानिक पोलिसांच्या मदतीने संशयिताचा शोध घेण्यात आला. पोलिसांचे वाहन इराणी वस्तीत येत असल्याचे पाहून आरोपी घरासमोरून मोटारसायकलने पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पथकाने त्याचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव हसन अली शेखु बेग (वय ३५, रा. इराणी गल्ली, शिवाजीनगर, परळी वैजनाथ, जि. बीड) असे आहे. आरोपीच्या घराची पंचांसमक्ष झडती घेतली असता गुन्ह्यातील मुद्देमाल मिळून आला. यामध्ये सोन्याची चैन, सोन्याची कछवा आकाराची अंगठी आणि सोन्याची अंगठी अशा दागिन्यांचा समावेश असून, त्यांचे एकूण वजन व किमतीनुसार सुमारे ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असून, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांच्या नेतृत्वात सपोनि योगेश धोत्रे तसेच पोलीस अंमलदारांनी केली.४८ तासांत गुन्ह्याचा छडा लावून आरोपीला अटक केल्याने वाशिम पोलिसांच्या तत्पर तपासाचे कौतुक होत आहे.





