सेलू येथे श्रावणमासी ज्ञानेश्वरी प्रवचनमालेत २२ व्या वर्षातील ६ वे पुष्प

सेलू : प्रत्येकाने आपल्या कर्मामुळे आपले आणि जगाचे नुकसान होईल असे कर्म सोडून दिले पाहिजे. दुसऱ्याचे मन दुखावणे योग्य नाही. प्रत्येकाने प्रत्येकाकडून शुभ भावना घेतली पाहिजे. दुसऱ्यांची भावना आपल्याबद्दल चांगली ठेवणे हे महत्त्वाचे आहे. त्यासाठी आपले कर्म सतत चांगले पाहिजे. चांगल्या कर्माचे फळ चांगलेच, तर वाईट कर्माचे फळ वाईटच मिळते. त्यामुळे प्रत्येकाबद्दल चांगले कर्म ठेवा, चांगला व्यवहार करा, दुसऱ्यांचे वाईट करायचेच नाही ही भावना जोपासत राहावी, कारण कर्माचे फळ निश्चितपणे मिळणारच असल्या कारणाने प्रत्येकाने कर्म विचार करूनच करावे, असे आवाहन वालूर येथील प्रजापिता ब्रह्मकुमारीजच्या वैशाली बहन यांनी केले आहे.
त्या येथील केशवराज बाबासाहेब मंदिरातील श्रावणमासी ज्ञानेश्वरी प्रवचनातील २२ व्या वर्षातील ६ वे पुष्प गुंफताना मंगळवार, १८ ऑगस्ट रोजी बोलत होत्या.यावेळी आशीर्वचनपर बोलताना त्या म्हणाल्या की, आपण जे कर्म करतो त्याचे परत काय मिळणार आणि त्याचा काय परिणाम होणार, याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. आपले कर्म चांगले बनवा, एवढेच नाही तर महान बनवा आणि ईश्वराला सोबत ठेवा. तरच आपल्याला परमात्म्याची मदत मिळेल व कार्य यशस्वी होईल, तसेच संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीचे सार्थक होईल. हा ग्रंथ कशासाठी लिहिला? तर आपल्याला जीवनात महानता मिळावी यासाठी हा ग्रंथ लिहिला आहे. आपण आपल्या मनात डोकावून बघा, विचारांना एकाग्र करा. मी एक अतिसूक्ष्म एक चैतन्य शक्ती डोळ्यासमोर पाहत आहे, गाण्यांच्या द्वारे ऐकत आहे, मी या संपूर्ण शरीराला चालवणारी एक शक्ती बघत आहे. मी चैतन्य शक्ती ज्योती स्वरूप आत्मा आहे, माझे पिता स्वयं परमात्मा निराकार ज्योती स्वरूप आहेत, असे म्हणत परमात्म्यासोबत रोज अनुभूती करा; कारण आंतरिक शक्तीतच खरे सुख सामावलेले आहे, असेही वैशाली बहन यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
परमात्मा स्वयंभू आहे, स्वतःची रचना स्वतः केलेली आहे आणि अशा परमात्म्याची रचना माऊलींनी ज्ञानेश्वरी या ग्रंथरूपाने आपल्यासमोर ठेवलेली आहे. एवढ्या सुंदर ग्रंथाची रचना माऊलींनी केलेली आहे. हा परमात्मा दुःख निवृत्ती करतो.जो ईश्वर सर्व मनुष्य सृष्टीला तारणारा आहे, परमात्मा मनुष्य आत्म्याला निर्माण करतो. त्यामुळे सगळ्यात मोठा ग्रंथ व सगळ्यात मोठे शास्त्र म्हणजे श्रीमद्भगवद्गीता हे होय. आणि संस्कृतमधील श्रीमद्भगवद्गीता संत ज्ञानेश्वर महाराजांनी प्राकृत भाषेत आपल्याला समजावण्यासाठी आपल्यासमोर रूपांतरीत केलेली आहे. एखाद्या परिवर्तनशील समस्येमध्ये आपण अडकलो तर काय करावे, याचे ज्ञान श्रीमद्भगवद्गीतेत प्राप्त झालेले आहे.
ज्ञानेश्वरी आणि श्रीमद्भगवद्गीतेचे चिंतन करण्यात आपण अडखळणार नाही; कारण ज्याच्याकडे ज्ञान आहे, ज्ञान म्हणजे ३ रा डोळा आणि डोळ्यांमध्ये अंजन घातले तर दृष्टी स्पष्ट होते. हा ज्ञानाचा खजिना आहे. डोळ्यात सत्य ज्ञानाचे अंजन घातले, तर सगळ्या समस्यांवर आपण मात करून पुढे जाऊ शकतो. सत्य ज्ञानाची गरज प्रत्येक मनुष्याला आहे. ज्ञानाशिवाय आपण अंध आहोत. ज्ञान हे डोळे आहेत आणि ते ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान मिळते.आपणास परमात्म्याची साथ नसेल तर हार निश्चित आहे. ज्याच्या सोबत ईश्वर आहे, तो कायम विजयी होणारच आहे. ईश्वरासोबत वैर करणारे वाचू शकत नाहीत.
कौरवांची हार आपण पाहिलेली आहे. विनाश का झाला? कारण त्यांनी ईश्वराचा कायम विरोध केला. ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण झोपलेले होते, त्यावेळी दुर्योधन उशाशी आणि अर्जुन पायथ्याशी बसले आणि म्हणाले इष्ट देवा जागृत व्हा. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण यांनी पाहिले, आधी अर्जुनाला बघितले आणि सांगितले साथ हवी आहे तर मी नक्की देईन, मात्र शस्त्राविना तुमच्या सोबत राहील. आणि याच मुद्द्यावर दुर्योधनाने विचार केला की, भगवान श्रीकृष्ण जर हातात शस्त्र घेणारच नसतील तर त्यांचा काय उपयोग? त्यावेळी दुर्योधनाने भगवान श्रीकृष्णाला सांगितले की आम्हाला अक्षौहिणी सेना देऊन टाका. आणि तिथेच दुर्योधन चुकला. जर आपणासोबत ईश्वरच नसेल तर विजय कसा होईल, याचा त्यांनी कसलाही विचार केला नाही. त्यामुळे प्रत्येकाकडे सच्च्या मनाची आवश्यकता आहे. मनाची भावना सत्य असावी. सर्व संतांनी हेच शिकवले आहे. ईश्वराची मनातून आठवण करा. सद्गुरुला सोबत ठेवा.
संत जनाबाई यांनी देखील ईश्वराला कायम सोबत ठेवण्याचा प्रयत्न केला. ईश्वराला पिता मानले आणि अधिकाराने बोलावले. त्यामुळेच त्यांनी विठ्ठल विठ्ठल ज्यामधून आवाज बाहेर येईल ती गोवरी माझी आहे, असे आत्मविश्वासाने सांगितले; कारण संत जनाबाई यांच्यासोबत ईश्वर होता. कर्मामध्ये ईश्वराची आठवण सामावली जाते, त्यावेळी कर्म श्रेष्ठ बनते, तरच कर्मामध्ये महानता येते. भावना आणि अभिप्राप्ती तेवढी श्रेष्ठ असते. दुसऱ्याबद्दल वाईट भावना ही आपल्याला ईश्वरापासून दूर नेते. त्याचे उदाहरण म्हणजे कौरवांची भावना कोणाबद्दलही चांगली नव्हती. प्रत्येकासोबत त्यांची भावना वाईट होती आणि प्रत्येकासोबत चांगली भावना ठेवणारे पांडव आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या मनात जागोजागी कौरव-पांडव कुठे आहेत ते शोधले पाहिजे. आणि हे शोधून कौरवांना बाजूला ठेवून पांडवांना जागृत ठेवले, तरच आपला विजय निश्चित होईल.कौरव म्हणजे विकारांचे प्रतीक आहेत, दुष्टवृत्तीचे प्रतीक कौरव आहेत. आपल्यामधील राग, द्वेष हे देखील कौरवांचेच प्रतीक आहेत. आपल्यातील विकारांवर विजयी बनतो तो भीम झाला. कौरवांचा पराभव भीमाने केला. भीम हे ईश्वराचे प्रतीक आहेत, भीम शक्तिशाली आहेत, तसेच सहनशीलता सामावून घेणारी शक्ती त्यांच्यात आहे. भीमाला ज्ञानाचे व सर्व शक्तींचे भोजन खूप लागते. ज्ञान बुद्धीमध्ये येत नाही तोपर्यंत परमात्म्याची आठवण होत नाही.
ईश्वर आपल्या सोबत आहे म्हणजे ज्ञान आपल्या सोबत आहे, ही भावना कायम प्रत्येकाने मनात जोपासली पाहिजे. ईश्वराला स्वीकारले नाही तर आपले अस्तित्व राहणार नाही. मनुष्य धोका देऊ शकतो, साथ सोडू शकतो; मात्र ईश्वर धोका देणार नाही आणि साथही सोडणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने ईश्वराशी जवळीक निर्माण करावी, असे वैशाली बहन यांनी यावेळी आशीर्वचनपर बोलताना स्पष्ट केले. उपासना करणे व परमात्म्यात लीन होणे गरजेचे आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.प्रवचनाची सांगता रघुराज सोन्नेकर यांच्या पसायदानाने झाली. या प्रवचनासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





