
धर्मापुरी शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक; शैक्षणिक गुणवत्तेचा घेतला आढावा
परभणी : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यभरात ५ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘चला शाळेत जाऊया अभियान’ राबविले जात आहे. या अभियानांतर्गत परभणी जिल्ह्याचे पालक अधिकारी म्हणून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), पुणे चे संचालक डॉ. हेमंत वसेकर यांनी, ९ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धर्मापुरी (केंद्र टाकळी कुंभकर्ण, ता. जि. परभणी) येथे प्रत्यक्ष भेट देऊन शैक्षणिक गुणवत्ता व भौतिक सुविधांचा सर्वकष आढावा घेत शाळेतील विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला.
या भेटीदरम्यान जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) परभणीचे प्राचार्य सुदर्शन चिटकुलवार, नोडल अधिकारी तथा नांदेड डाएटचे प्राचार्य अमोल निळेकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रा. श्रद्धा झिंजुरके, शिक्षणाधिकारी सविता बिरगे, योजना शिक्षणाधिकारी संजय ससाने, वरिष्ठ अधिव्याख्याता गणेश शिंदे, गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत आदी उपस्थित होते.
नाविन्यपूर्ण उपक्रमांची पाहणी व पोषण आहार वाटप
सकाळी १० वाजता संचालक डॉ. हेमंत वसेकर यांनी शाळेच्या परिपाठास भेट दिली. शाळेत राबविल्या जाणाऱ्या ‘चला शिकूया प्रयोगातून विज्ञान’ या उपक्रमांतर्गत दररोज घेतल्या जाणाऱ्या प्रयोगांची त्यांनी पाहणी केली. शाळेत सकाळी ६ ते ८ या वेळेत सुरू असलेले ऑनलाईन स्पोकन इंग्लिशचे वर्ग तसेच उच्च प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी रात्री राबवली जाणारी अभ्यासिका या उपक्रमांचे त्यांनी विशेष कौतुक केले. या अभ्यासिकेसाठी पालकांचा सक्रिय सहभाग आणि दररोज दोन शिक्षकांचे नियंत्रण पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी पालक अधिकारी संचालक डॉ. हेमंत वसेकर यांच्या हस्ते व उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. संचालक वसेकर यांनी वर्गांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. नाविन्यपूर्ण प्रयोगशाळा व ग्रंथालय उपक्रमाची पाहणी करत विचारलेल्या प्रश्नांना विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने उत्तरे दिली. तसेच पिण्याच्या पाण्याची सोय, किचन शेड व परिसराच्या स्वच्छतेची पाहणी करून काही आवश्यक सुधारणा सुचविल्या.
गुणवत्ता वाढीसाठी शनिवार-रविवारही वेळ देण्याचे आवाहन
दुपारी ४ वाजता जिल्हा परिषद सभागृहात केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी व विषय साधन व्यक्तींची आढावा बैठक पार पडली. जिल्ह्याच्या ‘परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स’ (PGI) आणि ‘निपुण भारत’ अभियानातील सद्यस्थितीबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. परभणी जिल्ह्याची शैक्षणिक कामगिरी उंचावण्यासाठी तात्काळ कृती कार्यक्रम तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. शैक्षणिक प्रगतीसाठी पर्यवेक्षकीय यंत्रणेने आवश्यकतेनुसार शनिवार-रविवारचा वेळही देण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले. यानंतर संचालक डॉ. हेमंत वसेकर यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर व जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन जिल्ह्यातील शैक्षणिक विकासावर सविस्तर चर्चा केली.
डाएट परभणी येथे विविध उपक्रमांचा आढावा
दौऱ्याच्या शेवटी त्यांनी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) परभणी येथे भेट देऊन सुरू असलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेतली. याप्रसंगी डाएटचे प्राचार्य सुदर्शन चिटकुलवार, नांदेड डाएटचे प्राचार्य अमोल निळेकर, वरिष्ठ अधिव्याख्याता गणेश शिंदे, अधिव्याख्याता श्रीमती मोकले, अधिव्याख्याता अभय परिहार, अधिव्याख्याता संतोष ठाकूर, अधिव्याख्याता अतुल चंद्रमोरे, अधिव्याख्याता राम नाईकनवरे, अधिव्याख्याता ज्योत्स्ना धुतमल, विषय सहायक डॉ. संतोष सेलुकर, विषय सहायक प्रसन्न भावसार, लेखा सहायक ओंकार कुरे आदी उपस्थित होते. शेवटी प्राचार्य सुदर्शन चिटकुलवार यांनी आभार व्यक्त केले.





