सेलूत भव्य सोहळा, अणुशास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

सेलू : राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग महाराष्ट्र व श्रीराम प्रतिष्ठान, सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने, परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यात “क्युरिऑसिटी सायन्स अँड इनोव्हेशन ॲक्टिव्हिटी सेंटर” साकारत आहे. या महत्त्वाकांक्षी विज्ञान केंद्राचा भूमिपूजन सोहळा आज (ता. ११) शनिवार रोजी प्रिन्स इंग्लिश स्कूल येथे आयोजित करण्यात आला आहे.
या भूमिपूजन कार्यक्रमाचे उद्घाटक अणुशास्त्रज्ञ, अध्यक्ष राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान कमिशन महाराष्ट्र राज्य, माजी अध्यक्ष भारतीय अणुऊर्जा मंडळ तथा भारत सरकार अणुऊर्जा विभाग अधिकारी डॉ. अनिल काकोडकर असतील. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान कमिशनचे सचिव डॉ. एन.जी. शहा, वैज्ञानिक दिनेश जगताप, श्री. तुळजाभवानी शुगर्सच्या टेअरमन भावनाताई बोर्डीकर आदी मान्यवरांच्या उपस्थिती असेल. इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे उपसंचालक जलील शेख, उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी, परभणी शासकीय वैद्यकीय महविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, इ.मा.ब.क. परभणी विभागाचे सहाय्यक संचालक रामेश्वर मुंढे, शिक्षणाधिकारी सविता बिरगे, सुनीलज पोलास, सेलू तहसीलदार डॉ. शिवाजी मगर, उपशिक्षणाधिकारी गोविंद मोरे, गटशिक्षणाधिकारी मनोज चव्हाण आदी मान्यवरांसह सेलू शहरातील शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने विज्ञान जत्रा, वैज्ञानिक परेड, देखावे, चर्चासत्र आदी भरगच्च कार्यक्रम होत आहेत. उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक, श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा बाजार समितीचे सभापती डॉ.संजय रोडगे यांनी केले आहे.
या केंद्राच्या स्थापनेमागील मुख्य उद्देश म्हणजे शालेय व कॉलेजातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा वाढवणे, प्रयोगात्मक शिक्षणाला चालना देणे व नवकल्पनांची जाणीव निर्माण करणे हा आहे. या सेंटरमुळे जिल्ह्यातील विद्यार्थी दूरगामी अभ्यासापासून प्रेरणा घेतील, आणि भविष्यात संशोधन, उद्योगक्षेत्रात वाटचाल करण्यास मदत होईल. या सेंटरमध्ये विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा, इनोव्हेशन हब, व्हीआर लॅब, ३डी थिएटर, इन्फोटेन्मेंट पार्क, स्विमिंग पूल, इनडोअर स्टेडीयम, ५डी थिएटर, रोबोटिक लॅब, तारांगण, शैक्षणिक खेळ, क्रिकेट टर्फ अशा आधुनिक सुविधा असणार आहेत.





