संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी एक्सप्रेस कॅनॉलद्वारे पाणी सोडण्याची माकपची मागणी
सेलू : संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जायकवाडी धरणातील पाणी डाव्या किंवा उजव्या कालव्यातून जे जवळ पडते ते लोअर दुधना धरणात सोडण्यात यावे, तसेच एक्सप्रेस कॅनॉलद्वारे लोअर दुधना धरणात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणीभारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी परभणी जिल्हा कमिटीच्या वतीने पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना शनिवारी, ५ सप्टेंबर रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या वर्षी एल निनोमुळे पावसाने दगा दिला त्यामुळे सन १९७२ पेक्षा मोठा दुष्काळ व पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उग्र स्वरूप धारण करण्याची दाट शक्यता आहे. पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे आरोग्य व रोजगाराचा प्रश्नही गंभीर होऊ शकतो. अशा परिस्थितीत आतापासूनच युद्धपातळीवर पाणी प्रश्न सोडविण्यासाठी शासन व प्रशासनाने उपाययोजना करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे.लोअर दुधना धरणात २४ टक्के पाणीसाठा आहे. परतीच्या पावसाची वाट न बघता उपाययोजनांची आखणी केली पाहिजे. त्यासाठी पाण्याचा योग्य वापर, पाणी वाया जाऊ न देणे, लोअर दुधना धरणात जायकवाडीचे पाणी सोडणे इत्यादी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी जनतेला विश्वासात घेऊन योग्य ती पावले न उचलल्यास हाहाकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी कॉम्रेड रामेश्वर पोळ, रामकृष्ण शेरे पाटील, दत्तुसिंग ठाकुर, सुभाष शहाणे, आकाश खनपटे तसेच नगराध्यक्ष मिलिंद सावंत, भाजप तालुकाध्यक्ष गणेश काटकर, जाहेद घौरी, विश्वास शेरे, रामप्रसाद बोराडे आदींची उपस्थिती होती.





