संचालक मंडळाच्या आठ जागांचा निवडणुकीचा निकाल जाहीर
परभणी : दी परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या २१ पैकी ८ जागांसाठी रविवारी झालेल्या निवडणुकीचा निकाल सोमवारी, २० जुलै २०२६ रोजी जाहीर झाला. अटीतटीच्या या निवडणुकीत आमदार सईद खान, आमदार राजू नवघरे यांच्यासहित नंदकुमार डाखोरे, आकाश चौखट, राजामती मुटकुळे, शोभा बोबडे, अभय सावंत, दत्तात्रय मायंदळे यांनी विजय मिळविला. तर १० जुलै रोजी १३ संचालकांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली होती.
उर्वरित आठ जागांसाठी रविवारी जिल्ह्यातील १४ मतदान केंद्रांवर ९८.२१ टक्के एवढे विक्रमी मतदान झाले होते. सोमवारी सकाळी कल्याण मंडपम परिसरात निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश काकडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बालासाहेब नांदापूरकर, एम. यू. यादव यांच्या मार्गदर्शनात ७ टेबलांवर प्रत्यक्ष मतमोजणीची करण्यात आली. या निवडणुकीत प्राथमिक कृषी पतपुरवठा विविध कार्यकारी सेवा सोसायटी संस्था प्रवर्गातून नंदकुमार लक्ष्मणराव डाखोरे विजयी झाले आहेत. त्यांनी तुळशीराम यशवंतराव बोबडे यांचा पराभव केला. मानवत गटातून आकाश पंडितराव चोखट विजय झाले आहेत. त्यांनी अमोल गंगाधर कदम यांचा पराभव केला. हिंगोली गटातून राजामती शिवाजी मुटकुळे विजय झाल्या आहेत. त्यांनी रमेश विठ्ठलराव शिंदे यांचा पराभव केला. वसमत गटातून आमदार चंद्रकांत (राजू) रमाकांतराव नवघरे विजय झाले असून त्यांनी तुषार देवराव जाधव यांचा सपशेल पराभव केला. कळमनुरी तालुक्यातून अभय अरुणराव सावंत विजयी झाले आहेत. त्यांनी बालासाहेब मगर दत्तराव कदम यांचा पराभव केला. इतर शेती संस्था गटातून आमदार सईद खान २९० मते घेऊन विजय झाले आहेत. त्यांनी विजय रावसाहेब जामकर यांचा अवघ्या तीन मतांनी पराभव केला. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती गटातून शोभा हनुमंतराव बोबडे १ हजार २१६ मते घेऊन विजयी झाल्या आहेत. या गटातून प्रशास चंद्रशेखर ठाकूर १२, तुकाराम धोंडेबा रुमाले ९, यशवंत संपतराव वाटोजे ११, संजय ज्ञानोबा सारणीकर ३ अशी मते मिळाली आहेत. विमुक्त जाती – विमुक्त जमाती विशेष मागास प्रवर्ग गटातून दत्तात्रय रामभाऊ मायंदळे १ हजार ६६ मते घेऊन विजयी झाले आहेत. त्यांनी स्वराज्यसिंह परिहार यांचा पराभव केला. परिहार यांनी ३४८ मते मिळविली. तर अभय बालासाहेब कुंडगीर ५, सुनंदा अशोकराव फलके ९, बळीराम रामचंद्र सोरेकर यांनी ३ मते मिळविली.
बिनविरोध निवड झालेल्या संचालकांची नावे :जेष्ठ नेते सुरेश अंबादासराव वरपुडकर, तुषार काशिनाथराव दुघाटे, आमदार रत्नाकर माणिकराव गुट्टे, मेहराज़ खान शेरगुल खान पठाण, जेष्ठ नेते रामप्रसाद वामनराव कदम बोर्डीकर, आमदार मेघना दिपक साकोरे-बोर्डीकर, आमदार राजेश उत्तमराव विटेकर, राजेश साहेबराव पाटील दिग्विजय राजेश पाटील, सुरेशराव सखाबापु देशमुख, भावना सचिन बोर्डीकर-मुंगसे आणि प्रेरणा समशेर वरपुडकर, भगवान नारायणराव वाघमारे





