नागरिकांनी ग्रामसभेस उपस्थित राहून सहकार्य करण्याचे प्रशासनाचे आवाहन
सेलू : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) सध्या सुरु आहे. हा कार्यक्रम २० जून २०२६ पासून अंमलात आला आहे. या मोहिमेअंतर्गत मतदार यादी पुनरीक्षणाची कामे विहित मुदतीत पूर्ण व्हावीत, याकरिता जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये २९, ३० आणि ३१ जुलै २०२६ या कालावधीत विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले आहे.
या विशेष ग्रामसभांमध्ये मतदार यादीतील मयत, स्थलांतरित आणि दुबार मतदारांच्या याद्यांचे प्रत्यक्ष वाचन केले जाणार आहे. तसेच प्रलंबित असलेल्या मतदारांकडून गणना फॉर्मचे संकलन करण्यासारखी महत्त्वाची कामे पूर्ण केली जातील.या प्रक्रियेत पारदर्शकता आणि अचूकता राहावी यासाठी परिसरातील सर्व मतदार व नागरिकांनी आपापल्या ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार डॉ. शिवाजी मगर यांनी केले आहे.





