जोरदार घोषणाबाजीत टीईटी सक्तीस विरोधासह विविध मागण्या

परभणी : राज्य सरकारने शिक्षकांच्या सर्व प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात, यासाठी शिक्षक व शिक्षकेतर संघटना समन्वय महासंघाच्या वतीने शुक्रवारी, ५ डिसेंबर २०२५ रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांचा महामोर्चा काढण्यात आला.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार शिक्षक सेलचे राज्याध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के, शिक्षक सेनेचे बाळासाहेब राखे, समन्वय समितीचे अध्यक्ष नारायणराव जाधव, रवि लोहट, प्रभाकर शिरसाठ, अमृत देशमुख राजू शिंदे, यशवंत मकरंद, निशांत हाके आदींसह विविध संघटना पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली मोर्चात मोठ्या संख्येने शिक्षक बंधू भगिनी सहभागी झाल्या होत्या.
आंदोलनस्थळी मोर्चाला संबोधित करताना मराठवाडा शिक्षक संघाचे यशवंत मकरंद यांनी, सरकारला अनुदानित शाळा बंद करायच्या आहेत आणि शिक्षणाच्या जबाबदारीतुन मुक्त व्हायचे आहे असा घणाघात केला. विविध संघटना पदाधिकाऱ्यांनी मोर्चाला संबोधित करताना शिक्षकांचे प्रश्न पोटतिडकीने मांडले आणि शिक्षकांच्या भवितव्यासाठी एकजूट दाखविण्याचे आवाहन केले.
दुपारी दोनच्या सुमारास जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथून मोर्चाची सुरुवात झाली. ‘लढेंगे जितगें’ आणि शिक्षक विरोधी धोरणांचा निषेधासह विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला. या वेळी महासंघाच्या वतीने प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. टीईटी निर्णयावरील पुनर्विचार याचिका तातडीने दाखल करावी. टीईटी निकालाचा चुकीचा अर्थ काढून विविध कार्यालयाकडून सुरू असलेली कार्यवाही तत्काळ थांबवणे. शिक्षकांना जुनी पेन्शन योजना, शिक्षण सेवक योजना रद्द करून निश्चित वेतनश्रेणी तसेच १०, २०, ३० वर्षांनंतरची सुधारित तीन वेतन लाभांची आश्वासित प्रगती योजना लागू करणे. शिक्षकभरती प्रक्रियेतील त्रुटी दूर करून तातडीने कार्यवाही करावी. सातव्या वेतन आयोगातील शिक्षकांच्या पदांनुसार वेतनश्रेणी नियमानुसार त्वरित मंजूर करावी. १५ मार्च २०२४ चा संचमान्यता विषयक जीआर रद्द करणे आदी विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. या महामोर्चामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार शिक्षक सेल, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, मुख्याध्यापक शिक्षक संघ, अखिल भारतीय राष्ट्रभाषी शिक्षक समन्वय महासंघ, ज्ञानसाधना प्रतिष्ठान व इतर अनेक शिक्षक व शिक्षकेतर संघटनांनी सक्रिय सहभाग घेतला.

शिक्षक एकजूट दाखवून द्या
२०-२५ वर्ष सेवा झालेल्या शिक्षकांवर टीईटी लादणे अन्यायकारक आहे. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्य सरकारने टीईटी संदर्भात पुनर्विचार याचिका दाखल करणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु सरकार शिक्षकांच्या प्रश्नांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे हजारो शिक्षक बांधव तुटपुंज्या, तसेच पगाराविना उपाशीपोटी आहेत. जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे. टीईटी सक्ती रद्द करण्यात यावी यासह शिक्षकांचे अनेक प्रलंबित प्रश्न तत्काळ निकाली काढण्यासाठी राज्यभरातील सर्व शिक्षक संघटना महामोर्चाद्वारे एकत्र आल्या आहेत. शिक्षकांची जात, धर्म आणि विचार ‘शिक्षक’ आहे. येणाऱ्या काळात आणखी तीव्र आंदोलनाशिवाय आता पर्याय नाही. त्यामुळे एकजूटीने मुंबईत धडक मारून शिक्षक आपली ताकद दाखवून देणार आहेत. – प्रा.किरण सोनटक्के, राज्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार शिक्षक सेल





