स्वामी रामानंद तीर्थ ग्रंथालयात स्व. खारकर मामांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम
सेलू : चांगले विचार आणि दूरदृष्टी ठेवून केलेली कृती कायम स्मरणात राहते. विकास करताना व्यक्तीपेक्षा सार्वजनिक हित दृष्टिसमोर ठेवले पाहिजे. खारकर मामांनी शिक्षक ते नगराध्यक्ष असा हा प्रवास अतिशय उत्तमरीतीने पार पाडला. दूरदृष्टी आणि सर्वव्यापी नेतृत्व जोपासणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे वसंतराव खारकर मामा होते, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांनी केले.
स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयात ग्रंथालयाचे अध्यक्ष स्वर्गीय वसंतराव खारकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी खारकर मामांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकताना डॉ. कुलकर्णी यांनी, खारकर मामा वाचनसंस्कार रुजवण्यासाठी नेहमी नवनवीन उपक्रम राबवण्याचा आग्रह धरत असत, असे आठवणी सांगताना नमूद केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार नारायण पाटील हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक नागेश देशमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथालयाचे सचिव चंद्रशेखर मुळावेकर यांनी केले. सूत्रसंचालन महादेव आगजाळ यांनी केले, तर आभार अजित मंडलिक यांनी मानले.या प्रसंगी प्रकाश धामणगावकर, कैलासराव कदम, प्रा. के. डी. वाघमारे, ग्रंथालयाचे अध्यक्ष महेशराव खारकर, डॉ. शरद ठाकर, विनायक मोगल, प्रा. अनंत मोगल, लक्ष्मण बागल, प्रा. शाम पवार आणि प्रा. जयकुमार बोराडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.





