स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; तब्बल ३४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
वाशिम :- जिल्ह्यात अवैध गोवंश वाहतुकीला आळा घालण्यासाठी वाशिम पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून, स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत २३ बैलवर्गीय जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या तीन वाहनांवर कारवाई केली. या कारवाईत एक आयशर व दोन बोलेरो पिकअप वाहनांसह अंदाजे ३४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक निखेश खामटोडे-पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत असून, अवैध गोवंश वाहतुकीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार ३० ऑगस्ट २०२६ रोजी विशेष मोहीम राबविण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, वाशिम ते मंगरुळपीर रोडवरील कळंबा महाली परिसरात गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तातडीने कारवाई करत संबंधित वाहनांची तपासणी केली.
तपासणीदरम्यान २३ बैलवर्गीय जनावरांची वाहतूक होत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत एक आयशर व दोन बोलेरो पिकअप वाहने ताब्यात घेतली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे ३४ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.या प्रकरणातील पुढील तपासासाठी गुन्हा पोलीस स्टेशन वाशिम (ग्रामीण) यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली असून, अशा प्रकारच्या वाहतुकीवर पोलिसांची करडी नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक निखेश खामटोडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधाकर आडे, पोलीस उपनिरीक्षक सचिन गोडले, पोहेकॉ/राहुल व्यवहारे, विनोद अवघडे, दिलीप देवकते, पोहेकॉ/राजकुमार यादव, भूषण ठाकरे, विठ्ठल महाले, संदीप दुतोंडे, तुषार ठाकरे तसेच चालक सुनील तायडे यांच्या पथकाने केली.





